Pune Cyber Crime: पिंपरी-चिंचवड : दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत असताना अशातच, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad News )परिसरातून सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट कस्टमर केअरच्या माध्यमातून एका ज्येष्ठ नागरिकाची 1 लाख 99 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. गुगलवर दिसलेल्या टोल फ्री क्रमांकावर विश्वास ठेवल्यामुळे रत्नाकर देवेंद्र नाशिककर (वय 64) यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.

हेही वाचा- सासरच्या संपत्तीवर आता सुनेचा अधिकार? सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; वाचा सविस्तर माहिती
नाशिककर यांना त्यांच्या कुटुंबातील बँक ऑफ बडोदा खात्याशी संबंधित डेथ क्लेम बाबत काही माहिती घ्यायची होती. यासाठी त्यांनी गुगलवर बँकेचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. याचदरम्यान त्यांना सायबर भामट्यांनी दिलेला बनावट क्रमांक मिळाला. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवले आणि त्यांचा विश्वास संपादन केला.
व्हॉट्सअॅपवर पाठवली फाईल
संशयित व्यक्तीने क्लेमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नाशिककर यांना व्हॉट्सॲपवर एक एपीके फाईल पाठवली. ही फाईल डाऊनलोड करून आवश्यक माहिती भरण्यास सांगण्यात आले. नाशिककर यांनी ती फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलचा ताबा आरोपींकडे गेला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 99 हजार 500 रुपये अज्ञात खात्यावर वळवण्यात आले.

पोलीस ठाण्यात धाव
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाशिककर यांनी तत्काळ रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस या क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेत आहेत.






