पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर चोरट्यांनी (Pune Crime) इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढवले असून चऱ्होली बुद्रुक येथील एका तरुणीसोबत धक्कादायक (Pimpri-Chinchwad News) घटना घडली आहे. तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्या मोबाईलचा ताबा घेत तब्बल 92,794 रुपये लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिघी पोलिसांनी तन्मय अमोल पांडे वय 19 रा. यवतमाळ सध्या रा. हिंजवडी आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तन्मय याने फिर्यादी महिलेच्या भाचीशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवली होती. काही दिवसांतच त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिला एम. परिवहन म्हणजेच M-Parivahan नावाचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी मोबाईलवर एक लिंक पाठवली. मात्र ही लिंक प्रत्यक्षात रिमोट ॲक्सेस देणारे संशयास्पद सॉफ्टवेअर असल्याचे तपासात समोर आले आहे.
तरुणीने ती लिंक उघडून ॲप डाऊनलोड करताच आरोपीने तिच्या मोबाईलवर पूर्ण ताबा मिळवला. त्यानंतर तिच्या बँक खात्याची माहिती मिळवत दोन दिवसांत परस्पर व्यवहार करून 92,794 रुपये काढून घेतले. हा प्रकार 13 आणि 14 डिसेंबर दरम्यान घडला.
बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याचे लक्षात येताच तरुणीने तातडीने दिघी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून आरोपी आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावर ओळख करून घेणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कोणतीही लिंक उघडू नये किंवा कोणतेही ॲप डाऊनलोड करू नये. सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहणे आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.







