पिंपरी-चिंचवड: पिंपरीतील (Pimpri Crime) वाल्मिकी चौक परिसरात दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या वैमनस्यातून 19 जणांच्या टोळक्याने कोयता व लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. आरोपींनी हवेत कोयते फिरवत परिसरात दहशत निर्माण केली आणि “आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आलात तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले.

याप्रकरणी 16 वर्षीय जखमी मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी 19 आरोपींविरोधात विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जुन्या वादातून हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिकी चौक आणि भाजी मंडई पार्किंग परिसरात दांडिया कार्यक्रम सुरू असताना फिर्यादी युवक तेथे उपस्थित होता. याच दरम्यान जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. कोयते व लोखंडी गजांचा वापर करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.
घटनास्थळी दहशतीचे वातावरण
हल्ल्याच्या वेळी फिर्यादी युवकाने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. मात्र, आरोपींनी हवेत कोयते फिरवत आणि धमक्या देत उपस्थितांना डरावून सोडले व लगेचच तेथून फरार झाले.
पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत
घटनेनंतर लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पथक आरोपींचा शोध घेत आहे. हल्ल्याचा नेमका उद्देश, पार्श्वभूमी व आरोपींची पार्श्वभूमी यासंदर्भात तपास सुरू आहे.







