पिंपरी-चिंचवड: ‘व्यसन हे केवळ माणसालाच नाही, तर संपूर्ण सुखी संसाराला कसं संपवतं’, याचा थरकाप उडवणारा अनुभव जाधववाडी (Pimpri-Chinchwad) परिसरात आला आहे. सकाळीच मद्यप्राशन केल्याचा जाब विचारणे एका पत्नीला इतके महागात पडले की, संतापलेल्या पतीने तिच्यावर चाकूने खुनी हल्ला केला.

समोर आलेल्या माहितीनुसार, मूळचा बीडचा असलेला दीपक लक्ष्मण भोगल हा जाधववाडीतील पंतनगर भागात आपल्या कुटुंबासह राहतो. गेल्या काही काळापासून तो मद्याच्या पूर्णपणे आहारी गेला होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याने दिवसाची सुरुवातच दारूने केली. पत्नीने विचारल, “सकाळी सकाळी कशाला दारू पिता?”
यावर आरोपीला इतका राग आला की, नशेत असलेल्या दीपकने आधी पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यानंतर घरातील धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.






