पिंपरी चिंचवड : शहर हादरवून सोडणारी एक धक्कादायक (Pimpri-Chinchwad Crime) घटना आकुर्डीत (Akurdi Crime) उघडकीस आली आहे. डी टू सी कमर्शियल दुकानासमोर बसलेल्या सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्याला एका अज्ञात व्यक्तीने दगड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून ठार मारल्याचा प्रकार घडला. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आकुर्डीतील दुकानासमोर बसलेल्या कुत्र्याला आरोपीने अचानक लक्ष्य केले. सुरुवातीला त्याने दगडाने हल्ला केला आणि नंतर लाकडी दांडक्याने एकामागून एक जोरदार प्रहार करून कुत्र्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर मृतावस्थेतील कुत्र्याला फरफडत रस्त्यावर आणले. या अमानुष कृत्याचे दृश्य पाहून नागरिक व प्राणीप्रेमी स्तब्ध झाले आहेत.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राणीप्रेमींनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दुकानाच्या मालकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 325, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील कलम 11(1) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
निगडी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. आरोपी कोण आहे, त्यामागचा हेतू काय होता आणि असा अमानुष प्रकार त्याने का केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिस तपासानंतर यामागील कारण स्पष्ट होईल. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्राणीप्रेमी संघटनांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.







