पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड (PCMC Election) महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (Ajit Pawar NCP) जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने केला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व 32 प्रभागांत मिळून किमान 5000 पेक्षा जास्त मतदारांची हेराफेरी झाली असून काही प्रभागांमध्ये एकगठ्ठा मतदारच गायब आहेत. या गोंधळामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने हरकती नोंदवण्यासाठीची मुदत वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. (Pimpri-Chinchwad News)

चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर आणि माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी ही माहिती दिली. मतदार याद्यांमधील चुका राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मते, मतदार याद्यांचे विभाजन करताना अधिकाऱ्यांनी कोणतीही स्थळ पाहणी केलेली नाही. काही भाग संपूर्णपणे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आले आहेत. अनेक प्रभागांत 5000 पेक्षा जास्त मतदारांची चूक झाली आहे. शिवाय, नागरिकांना आपले नाव कोणत्या प्रभागात आहे हे तपासण्यासाठी ॲप किंवा ऑनलाइन साधनाची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध याद्यांमध्ये मतदारांचे फोटो नसल्याने एकाच नावाच्या व्यक्तींबाबत गोंधळ वाढत आहे. प्रभाग पातळीवर विशेष सहायता केंद्रे सुरू करण्याची आणि दुबार नावांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी बहल यांनी केली.
माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी सांगितले की भोसरी मतदार संघात विधानसभा निवडणुकीवेळी 15000 पेक्षा जास्त नावे चुकीने इतर शहरांत टाकण्यात आली होती. आता पुन्हा 32 प्रभागांत मोठा गोंधळ निर्माण केला आहे. शहरात सुमारे 92000 दुबार नावे असल्याचाही त्यांनी दावा केला.
दरम्यान, प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींची तपासणी करण्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. हरकती गांभीर्याने घेऊन क्षेत्रीय अधिकारी स्वतः पडताळणी करतील, असेही त्यांनी सांगितले.






