पुणे (हिंजवडी): हिंजवडी (Hinjawadi News) परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास लक्ष्मी चौक परिसरात आरोपी महेंद्र सोपान कांबळे (35) हा दारूच्या नशेत घरी आला होता. तो कोणत्याही कारणाशिवाय आपल्या पोटच्या मुलाला अमानुषपणे शिवीगाळ करत मारहाण करत होता. आई मध्यस्थी करायला गेली आणि आपल्या लेकाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र, नशेत असलेल्या महेंद्रला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात समोर असलेला भाजी कापण्याचा धारदार चाकू उचलला.

“तुला आज खल्लासच करतो,” असे म्हणत महेंद्रने स्वतःच्या पत्नीच्या पोटात चाकू भोसकला. हा हल्ला इतका भीषण होता की, महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. जखमी महिलेला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.







