पिंपरी : हारपिक, लिझोल आणि कोलिन या प्रसिद्ध (Pimpri-Chinchwad News) ब्रँड्सच्या बनावट उत्पादनांची (Pune News) विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या दुकानांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात बनावट माल जप्त केला असून, दोघा दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सर्फराज तांबोळी (वय 43, रा. कसबा पेठ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून खैराज नारायणराव देवासी (वय 50, रा. वाहिला वस्ती, पाटीलनगर, डुडुळगाव) आणि जगदीश कुआराम देवासी (वय 28, रा. शिवाजीनगर, डुडुळगाव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सर्फराज तांबोळी हे ‘स्पीड अँड सर्च नेटवर्क’ कंपनीचे प्रतिनिधी आहेत. त्यांना माहिती मिळाली होती की, डुडुळगाव परिसरात हारपिक, लिझोल आणि कोलिन या स्वच्छता उत्पादनांच्या बनावट वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही माहिती मिळताच दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आबा काटपले आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली.
पोलिसांनी डुडुळगाव येथील ‘श्री राम बालाजी ट्रेडर्स’ या दुकानावर छापा टाकला असता खैराज देवासी यांच्या दुकानातून हारपिक, लिझोल आणि कोलिनसारख्या मिळत्याजुळत्या बनावट उत्पादनांचा 20,397 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर जगदीश देवासी यांच्या ‘बालाजी ट्रेडर्स’ या दुकानावर छापा टाकून 1,420 रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सल्ला दिला आहे की स्वच्छता उत्पादनं खरेदी करताना नेहमी अधिकृत वितरकांकडूनच खरेदी करावी, जेणेकरून बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या वस्तूंपासून नुकसान टाळता येईल.






