Pandharpur News: पंढरपूर : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून त्यामुळे सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच सोलापूरच्या सांगोला तालुक्यातून सत्तेची मस्ती आणि राजकीय मुजोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगोल्याच्या आमदाराच्या नातवाने चक्क आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला चढवल्याचा आरोप होत आहे. भरवस्तीत झालेल्या या राड्यामुळे सांगोल्यात खळबळ उडाली आहे.

सांगोल्यात माजी उपसभापती नारायण जगताप यांनी गणपतराव देशमुख यांचे नातू आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांनी थेट त्यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नारायण जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बाबासाहेब देशमुख सोमवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता त्यांच्या घरी आले होते. चहा पिण्यासाठी येत असल्याचे त्यांनी फोनवरून सांगितले होते. मात्र ते एकटे न येता त्यांच्या सोबत सुमारे 60 ते 70 कार्यकर्ते होते, असा दावा जगताप यांनी केला आहे. बाबासाहेब देशमुख घरात आले, तर इतरांना बाहेर थांबवण्यात आले होते.
चहा पिल्यानंतर बाबासाहेब देशमुख यांनी तुमचा मुलगा सोशल मीडियावर आमच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकतो, अशी तक्रार केल्याचे जगताप यांनी सांगितले. यावर आपण मुलाला समज देऊ आणि त्याच्यावतीने माफी मागतो, असेही आपण सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाबासाहेब देशमुख निघून गेल्यानंतर काही वेळातच आपल्या घरावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप नारायण जगताप यांनी केला आहे.
हल्ल्यावेळी घरातील लोकांना शिवीगाळ करण्यात आली तसेच आधीच तयारी करूनच ही मंडळी आली होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याविरोधात जगताप कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सांगोल्यासह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.






