पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Murlidhar Mohol) जागेची बेकायदेशीर (Jain Boarding House Pune) विक्री झाल्याच्या प्रकरणावरून सध्या पुणे आणि राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आले असून, जैन समाजाने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जैन बोर्डिंग हाऊसची जमीन ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली, त्या कंपनीमध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मोहोळ यांच्यावर सरळ आरोप करत, त्यांनी बिल्डरांना हाताशी धरून जैन बोर्डिंगची जागा हडपल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणामुळे जैन समाजात मोठा संताप निर्माण झाला असून, समाजाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जैन समाजाने या विक्री व्यवहाराची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करून समाजातील प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र, या भेटीनंतरही समाज आक्रमक भूमिकेतच आहे.

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या आरोपांबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते शुक्रवारी नियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला रवाना होणार आहेत. मात्र, त्यांच्या दिल्ली दौऱ्याला या वादामुळे नवे राजकीय वळण मिळाले असून, ते या प्रकरणात मौन कधी तोडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर सोशल मीडियावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जैन समाजाच्या भावनांपेक्षा काही लोकांचा नफा सरकारला महत्त्वाचा वाटतो का? तब्बल साडेतीन एकर जमीन कटकारस्थान करून हडपली गेली असून, सरकारमधील काही नेते आणि त्यांच्या नातलगांचाही यात सहभाग असल्याचे स्पष्ट होते. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे हे लोक पैशासाठी जैन मंदिर गिळंकृत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
जैन बोर्डिंग हाऊसची ही जमीन शिवाजीनगर येथे असून, 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची स्थापना केली होती. काही महिन्यांपूर्वी विश्वस्त आणि समाजातील सदस्यांमध्ये या जागेच्या विकासावरून मतभेद झाले होते. मात्र, आता ही जमीन परस्पर विकल्याचा आरोप होत असून, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियमबाह्यरीत्या मंजुरी दिल्याचेही जैन समाजाचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींमुळे जैन बोर्डिंगचा वाद हा सध्या पुण्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.







