पुणे: जैन बोर्डिंग प्रकरणानंतर (Murlidhar Mohol) आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Pune News) सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाच्या मुद्यावरून आंबेडकरी संघटनांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

पुणे स्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाची मागणी आंबेडकरी संघटनांनी केली होती. मालधक्का चौकातील 8 हजार 900 चौरस मीटर आरक्षित जागेचा व्यवहार रद्द करून ती जागा स्मारकासाठी हस्तांतरित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांच्या माध्यमातून दिले होते. मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही, असा आरोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीने केला आहे.
मोहोळ यांनी आंबेडकरी संघटनांची फसवणूक केल्याचा आरोप समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, निता आडसुळे आणि स्वाती गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. “सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी ही जागा 2000 साली आरक्षित करण्यात आली होती. तरीदेखील राज्य सरकारने ती जागा रस्ते विकास महामंडळामार्फत ‘एन. जी. व्हेंचर’ या खासगी कंपनीला विकली. त्यामुळे स्मारकाच्या विस्तारीकरणाचे काम खोळंबले आहे,” असे मोरे यांनी सांगितले.
मोरे पुढे म्हणाले, “स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आम्ही अनेक दिवसांपासून लढा देत आहोत. यासाठी उपोषणही केले होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आठ दिवसांत आरक्षित जागेचा करार रद्द करून ती जागा स्मारकासाठी देण्याचा आदेश काढण्याचे आश्वासन दिले होते. आंदोलनावेळी त्यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले. मात्र आता अडीच महिने उलटून गेले असले तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.”
समितीच्या मते, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी मोहोळ यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. खासगी कंपनीला स्मारकाची जागा देण्यात आली असल्याने केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याविरोधात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे.”
हे आंदोलन सोमवारी, म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयावर होणार आहे. त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही, तर शहरातील विविध भागांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाईल आणि ठिकठिकाणी निषेध सभांद्वारे मोहोळ तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असे शैलेंद्र मोरे यांनी स्पष्ट केले.







