Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी अचानक आपले सगळे नियोजित दौरे रद्द केले आणि थेट पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्याआधी आज त्यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

साई दर्शनानंतर त्यांनी सांगितले की, “नवीन वर्षाच्या निमित्ताने साईबाबांच्या चरणी दर्शन घेतलं. राज्यातील जनता, शेतकरी सुखी-समाधानी राहावेत, हीच प्रार्थना केली.”
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन होणार का? असा प्रश्न विचारला असता, जरांगे पाटील म्हणाले,
“मला वाटत नाही पुन्हा आंदोलनाची वेळ येईल. विखे पाटलांनी जबाबदारी घेतली आहे आणि समाजाने मुख्यमंत्री तसेच विखे पाटलांवर विश्वास ठेवला आहे. मराठवाड्यासाठी जीआर निघालेला आहे. सगळं काम त्याच पद्धतीने होईल, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. पण जर आंदोलनाची वेळ आलीच, तर ती सरकारसाठी अडचणीची ठरेल. मला समाजापेक्षा मोठं काही नाही.”
मग अचानक पुण्याला जाण्याचं कारण काय? यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले,
“एक ते दीड लाख MPSC विद्यार्थी सरकारच्या चुकीमुळे विनाकारण अडचणीत सापडले आहेत. स्वतःची काहीही चूक नसताना या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणं म्हणजे मोठी शोकांतिका आहे. या मुद्द्यावर मी मुख्यमंत्र्यांच्या OSD सोबत आणि विखे पाटलांशीही चर्चा केली आहे. त्यामुळे मी तातडीने पुण्याला जात आहे आणि MPSC विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. या गंभीर प्रश्नावर तात्काळ तोडगा काढावा, असा निरोप मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला आहे.”






