Lonikalbhor : लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त धार्मिक सोहळ्यांची धामधूम सुरू झाली असून चैत्र नवरात्राच्या शुभ मुहूर्तावर आज सकाळी श्रींचा महामस्तकाभिषेक करण्यात आला. सायंकाळी पारंपरिक विधीनुसार घटस्थापना करून यात्रेच्या कार्यक्रमांना औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या यात्रेला लोणी काळभोरसह परिसरातील भाविकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. यंदा गुरुवार (ता.2 एप्रिल) आणि शुक्रवारी (ता. 3 एप्रिल मुख्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. गुढीपाडव्यापासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगले आहे.
या यात्रेचा मुख्य वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे श्रीमंत अंबरनाथ (काळभैरवनाथ) आणि माता जोगेश्वरी यांच्या पारंपरिक विवाह सोहळ्याची प्राचीन परंपरा. गुढीपाडव्याच्या दिवशी तांब्याच्या घागरींनी सजलेली कावड गणपती मंदिरातून महादेव मंदिर मार्गे अंबरनाथ मंदिरात नेण्यात आली. महादेव मंदिरात ग्रामस्थांनी पाडवा पूजन केले, तर सायंकाळी अंबरनाथ व जोगेश्वरी माता यांचा साखरपुडा विधी पार पडला.
घटस्थापनेनंतर पाचव्या माळेला कावड सह्याद्रीच्या डोंगररांगांतील गवळेश्वर महादेव मंदिरात नेण्याची परंपरा आहे. तेथे लहानसा धार्मिक कार्यक्रम होतो. 29 मार्च रोजी घाणा भरणे व हळद फोडण्याचा कार्यक्रम होणार असून सातव्या माळेला अंबरनाथ व जोगेश्वरी यांना हळद लावण्याचा विधी पार पडणार आहे.
हनुमान जयंतीच्या पहाटे चार वाजता श्रींची महापूजा होऊन भाविकांकडून नैवेद्य अर्पण केला जातो. त्याच दिवशी रात्री छबिना, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. 3 एप्रिल रोजी पहाटे अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडेल, तर दुपारी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. 4 एप्रिल रोजी रात्री वरात काढून विवाह सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.
दरम्यान, शतकानुशतकांपासून चालत आलेली ही परंपरा ग्रामस्थ आजही मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने जपताना दिसतात. यात्रेच्या निमित्ताने गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.







