लोणी काळभोर: घरगुती भांडण झाल्यानंतर (Loni Kalbhor News ) माहेरी आलेल्या (Pune Crime) पत्नीची समजूत काढून सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता.14) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सासरा व मेव्हण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिभाऊ मारुती उपाध्ये (वय-५५) ओम हरिभाऊ उपाध्ये (वय-२०, दोघेही रा. गारूडवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बापलेकांची नावे आहेत. याप्रकरणी दिपक सुनिल पाथरकर (वय-३० रा. मु.पो.बोरीभडक, येडाईमंदिराच्या पाठीमागे, ता. दौंड जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक पाथरकर हे एक रिक्षा चालक आहेत. पाथरकर यांची पत्नी दिवाळीकरीता माहेरी गेली होती. तिला पुन्हा सासरी नांदायला घेऊन जाण्यासाठी लोणी काळभोर येथे एक बैठक बोलवली होती. यावेळी पाथरकर व त्यांचे नातेवाईक विवाहितेला आणण्यासाठी गेले होते.
बैठकित दिपक पाथरकर यांच्या पत्नीला सासरी पाठविण्याच्या कारणावरून भांडण झाले. पाथरकर हे पत्नीला सासरी पाठविण्याविण्यासाठी सांगत होते, परंतु पाथरकर यांचे सासू व सासरे त्यांच्या पत्नीला सासरी नांदण्यासाठी पाठविण्यास तयार नव्हते. त्यानंतर बैठकीतून उठून माघारी घरी जाण्यासाठी जात असताना, पाथरकर म्हणाले, माझ्या पत्नीला तुम्ही नांदण्यासठी पाठवले नाही तर मी सारखा माघारी येईन.
दरम्यान, पाथरकर असे म्हणाल्याचा राग म्हणत धरून हरिभाऊ उपाध्ये यांनी दगड उचलून पाथरकर यांच्या डोक्यात मारला त्यावेळी पाथरकर यांच्या डोक्यातून रक्त येवून ते जमीनीवर खाली पडले. तर ओम उपाध्ये याने हाताने मारहाण केली. तसेच दोघांनी मिळून पाथरकर यांच्या आई व आजोबांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. दोघांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यातभारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निलेश कोल्हे करत आहेत.







