Loni kalbhor : लोणी काळभोर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या 2026 च्या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. लोणी काळभोर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या शीतल कांबळे, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून अमोल टेकाळे यांनी निर्णायक आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, लोणी काळभोर–वडकी पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांना धूळ चारत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला.

आंबेगाव बुद्रुक (ता. पुणे) येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता.9) पार पडली. यावेळी हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले.
लोणी काळभोर गट व पंचायत समिती गणात बहुरंगी लढत पाहायला मिळाली. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. भाजपने कोपरा सभा, जोरदार प्रचार व शक्तीप्रदर्शन केले होते, तर राष्ट्रवादीने घराघरांत जाऊन ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला. अपक्ष उमेदवारांनी थेट मतदारांशी संवाद साधत वैयक्तिक संपर्क वाढवला होता.
तरीही गटात खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच रंगली होती. त्यामुळे अखेर बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी उमेदवारांची आघाडी स्पष्ट दिसू लागली. प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत गेल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, तर भाजप गोटात निराशेचे वातावरण पसरले. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
दरम्यान, या विजयाला राष्ट्रवादीच्या सातत्यपूर्ण जनसंपर्काची व स्थानिक प्रश्नांवरील लढ्याची पावती मानली जात आहे. विजयानंतर शीतल कांबळे, अमोल टेकाळे व विद्या गायकवाड यांनी मतदारांचे आभार मानत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या निकालामुळे लोणी काळभोर परिसरातील राजकीय समीकरणे बदलली असून राष्ट्रवादीची ताकद अधिक भक्कम झाली आहे.
उमेदवारांची नावे आणि मिळालेले मते
1) लोणी काळभोर जिल्हा परिषद गट
*राष्ट्रवादी : शीतल कांबळे (15529)
*भाजप : पूनम बाबुराव गायकवाड (10719)
शिवसेना : सिंपल गणेश कांबळे (1074)
शिवसेना उबाठा : कलावती अश्रुबा धेले (483)
बसपा : नीता संजय आवारे (719)
अपक्ष : रुपाली अविनाश कोरे (295)
अपक्ष : स्वाती गणेश थोरात (152)
*नोटा : 516
2) कदमवाकवस्ती पंचायत समिती गण
*राष्ट्रवादी : अमोल टेकाळे (6892)
*भाजप : ज्ञानेश्वर नामुगडे (6672)
अपक्ष : भरत मोहन मिसाळ (275)
अपक्ष प्रकाश नारायण भिसे (342)
*नोटा : 331
3)लोणी काळभोर-वडकी पंचायत समिती गण
*राष्ट्रवादी : रेश्मा काळभोर (5442)
*भाजप : श्वेता काळभोर (2660)
शिवसेना : नंदिनी कोळपे (1079)
अपक्ष : विद्या दत्तात्रय गायकवाड (5770)
*नोटा : 224







