Loni kalbhor : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पायी चाललेल्या व्यक्तीला विरुद्ध दिशेने चाललेल्या बुलेटने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सत्कार हॉटेल व लॉज समोर शनिवारी (ता.14) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवर मुले ही विद्यार्थी असून अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

राजेंद्र सोपान काळभोर (वय 52) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय राजेंद्र काळभोर (वय 31, रा. सिद्राममळा, रामदरा रोड, लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काळभोर हे थेऊर फाट्याकडून कुंजीरवाडीच्या दिशेकडे पुणे सोलापूर महामार्गावर पायी चालले होते. पायी चालत जात असताना, बुलेट मोटा सायकलवरील अनोळखी चालकाने त्याच्या ताब्यातील बुलेट मोटार सायकल वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन, राँग साईडने, भरधाव वेगात, हायगयीने, निष्काळजीपणाने व बेदरकारकपणे चालवुन, राजेंद्र काळभोर यांना जोरदार धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र काळभोर यांना उपचाराकरीता घेवुन न जाता, रोडचे बाजुला जखमी अवस्थेत सोडुन पळून गेले. या अपघातात गंभीर जखमी करुन राजेंद्र काळभोर यांचा मृत्यू झाला.
या अपघातात व राजेंद्र काळभोर यांच्या मृत्यूस बुलेटवरील चालक कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद अक्षय काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात चालकावर भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281, 125 (ब) सह मोटार वाहन कायदा कलम 119/ 177, 184, 134 (क) (ख) सह 187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.







