Land Fraud : येरवडा परिसरातील आगाखान पॅलेससमोरील कोट्यवधी रुपयांच्या प्लॉटवर मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-विक्री आणि गहाणखत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिल्लीतील व्यावसायिक अभिनव कोतरू (वय ५०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सुमारे ११ हजार ६०० चौरस फुटांचा हा प्लॉट दिवंगत ब्रिज किशन कोतरू यांनी १९७२ साली खरेदी केला होता. त्यांचे २१ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर २०२२ मध्ये वारस प्रमाणपत्र मिळाले आणि २०२५ मध्ये नगर भूमापन कार्यालयात मालकीची फेरफार नोंद कायदेशीर वारसांच्या नावावर करण्यात आली.
मात्र ७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्लॉटवरील वॉचमनला काही व्यक्तींनी जागा रिकामी करण्यास सांगितले. त्यांनी हा प्लॉट डिसेंबर २०२४ मध्ये खरेदी केल्याचा दावा केला. विशेष म्हणजे, ज्यांच्या नावाने व्यवहार दाखवला गेला त्या ब्रिज किशन कोतरू यांचे निधन तब्बल १२ वर्षांपूर्वी झालेले होते.
तक्रारीनुसार, ३ व ४ डिसेंबर २०२४ रोजी औंध येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ॲग्रीमेंट टू सेल, सेलडीड आणि गहाणखत नोंदवण्यात आले. अज्ञात व्यक्तीला ‘ब्रिज किशन कोतरू’ म्हणून उभे करून, दोन साक्षीदारांच्या मदतीने आणि एस.के. अँग्रोफूड टेक प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधीच्या सहभागाने हे दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे. या व्यवहाराच्या आधारे बँक कर्ज प्रक्रियाही सुरू झाल्याचे समोर आले आहे. सुमारे ११ कोटी रुपयांचा व्यवहार दाखवून ७० ते ८० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याची माहितीही तक्रारदारांना मिळाली आहे.
प्रश्न असा आहे की, मृत व्यक्तीच्या नावाने दस्त नोंदवताना ओळख पडताळणीची प्रक्रिया कशी पार पडली? निबंधक कार्यालयातील कागदपत्र तपासणी, बायोमेट्रिक पडताळणी आणि साक्षीदारांची जबाबदारी याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून नोंदणीकृत कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज, निबंधक कार्यालयातील रेकॉर्ड आणि संबंधित बँक व्यवहारांची छाननी केली जात आहे. कोट्यवधींच्या मालमत्तांवर बनावट व्यवहार करून ताबा मिळवण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी मालमत्तेची कागदपत्रे नियमित तपासून ठेवावीत, असा इशारा या घटनेतून स्पष्ट होत आहे.







