Fursungi : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील परवानाधारक खाद्यतेल कंपनीत घुसून व्हिडीओ शूटिंग, पोलिसांचे नाव पुढे करून दबाव टाकून दोन कथित पत्रकारांनी 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अजूनही जिल्ह्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. तर फुरसुंगी पोलीस ठाण्यात कथित पत्रकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर हंगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कथित पत्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी फ्रीझल फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक हर्षल संदीप धोक्रट (वय 24, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल धोक्रट हे ‘इंद्रायणी’ ब्रँडने तेल विक्री करतात.
दरम्यान, हर्षल धोक्रट यांच्या उरळी देवाची (ता. हवेली) येथे ‘इंद्रायणी’ ब्रँडचे खाद्यतेल तयार केले जाते. येथील गोडाऊनमध्ये 25 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तीन इसम अचानक घुसले. त्यापैकी दोघांनी कंपनीत थेट व्हिडीओ शूटिंग सुरू केले. “कंपनी अस्वच्छ आहे, पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची जाडी कमी आहे,” अशी तक्रार असल्याचे सांगत त्यांनी स्वतःला पोलिस कॉन्स्टेबल ननवरे आणि पत्रकार असल्याचे सांगितले.
यानंतर कंपनीचे ‘इंद्रायणी’ ब्रँडचे स्टिकर, शिक्का व तेलाचा डबा ताब्यात घेतला. आणि धोक्रट व त्यांच्या सहकाऱ्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलीस निरीक्षक अनुपस्थित असल्याचे सांगत जवळपास एक तास थांबवण्यात आले. याचवेळी दोन कथित पत्रकारांनी “10 लाख रुपये द्या, नाहीतर कंपनी बंद पाडू; सोशल मीडियावर बदनामी करून व्यवसाय उद्ध्वस्त करू,” अशी थेट धमकी दिली आहे.
दुसऱ्या दिवशी कात्रज-कोंढवा रोडवरील एका हॉटेलमध्ये पुन्हा भेट घेण्यात आली. तेथे मोबाईलच्या कॅलक्युलेटरवर 10 लाख रुपये टाईप करून “एवढी रक्कम द्यावी लागेल” असा दबाव टाकण्यात आला. “सेटलमेंट नाही केली तर एफडीए कडे तक्रार जाईल, बातमी पेपर आणि न्यूज चॅनेलवर लावू,” असा इशाराही कथित पत्रकारांकडून धोक्रट यांना देण्यात आला.
दरम्यान, संबंधितांनी वारंवार फोन व व्हॉट्सअॅप कॉल करून पैशांबाबत चौकशी केली. “पैसे नाही दिले तर त्रास होईल,” अशी उघड धमकी दिली. यावेळी धोक्रट यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या कंपनीकडे महाराष्ट्र शासनाचा वैध खाद्य परवाना असून सर्व कामकाज नियमानुसार चालते. कोणतेही गैरप्रकार नसल्याचा दावा करत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे.
या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून “पत्रकारिता की खंडणी?” असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी होत आहे.






