Crime : नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती शहरातील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालय येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शुक्रवारी दुपारी हडको परिसरातील वसतीगृहात ती पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

आकांक्षा गेल्या 2 वर्षांपासून हडको परिसरातील एका इमारतीत कॉट-बेसिसवर चालणाऱ्या वसतीगृहात राहत होती. हे वसतीगृह जीवन घोगरे पाटील यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे प्रदेश चिटणीस म्हणून ओळखले जातात. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, सुमारे 8 महिन्यांची वसतीगृहाची फी थकली होती. याच कारणावरून विद्यार्थिनीवर वारंवार मानसिक दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून आकांक्षाने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
आकांक्षाचे आई-वडील वीटभट्टीवर मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेली ही विद्यार्थिनी डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन नांदेडमध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, ज्या वसतीगृहात ती राहत होती तेथे 40 हून अधिक मुली कॉट-बेसिसवर राहत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक विद्यार्थिनींकडून महिन्याला सुमारे ₹2500 फी घेतली जात होती, मात्र या वसतीगृहाला अधिकृत परवानगी आहे की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जीवन घोगरे पाटील यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या अडचणी अधोरेखित करते. शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित वसतीगृह व्यवस्था, आर्थिक सहाय्य आणि मानसिक आधार किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव या घटनेमुळे पुन्हा एकदा झाली आहे.







