शिरूर,ता.२६: संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या रांजणगाव गणपती-खंडाळे (ता.शिरूर) येथील तिहेरी क्रूर जळीत हत्याकांडाचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, गुन्हा उघड झाल्यापासून सुमारे 24 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही गेला तरी गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागलेला नाही.

सतत येणारा पाऊस यामुळे आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच आरोपींनी गुन्हा करताना केलेली हुशारी यामुळेही आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे आहे. पोलिसांकडून पुणे जिल्हा ग्रामीण तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या आधारावर संबंधित हत्या झालेल्या महिलेची व दोन लहान मुलांची ओळख पटवण्यासाठी शोध सुरू आहे. त्यामधून काही माहिती मिळते का? यावरही पोलिसांची पथके काम करत आहेत. अशी गोपनीय माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे संबंधित महिला व दोन लहान मुलांना जाळून हत्या करणाऱ्या क्रूर कर्म्यांना शोधून काढण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव गणपती पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांची सहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी रवाना झाली आहेत. क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. असे रांजणगाव गणपती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.
दरम्यान रांजणगाव गणपती किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही भागातील परिसरातून कोणत्याही घर मालकाचे एक महिला व दोन लहान मुले अशा वर्णनाचे भाडेकरू बेपत्ता असतील तर त्यांनी रांजणगाव गणपती एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करावा. असे आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केले आहे.







