Bhimashankar : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात सुमारे 2,750 चौरस फुटांचा भव्य सभामंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे काम केवळ 4 महिन्यांत पारंपरिक दगडी बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण केले जाणार आहे. देशात पहिल्यांदाच पुरातत्त्व विभागामार्फत अशा स्वरूपाचा जीर्णोद्धार प्रकल्प राबवला जात असून, या दगडी बांधकामाची नोंद Guinness World Records मध्ये व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

खेड तालुक्यातील या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वी मान्यता दिली असून, एकूण 288 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी केवळ सभामंडपासाठी 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पारंपरिक साहित्य, कौशल्यपूर्ण कारागिरी आणि कमी कालावधीत दर्जेदार काम पूर्ण करण्याचा हा प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरेल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
सभामंडपाची रचना कशी असेल?
सभामंडपात एकूण 48 दगडी स्तंभ उभारले जाणार आहेत. प्रत्येक स्तंभ 2 ते 3 दगडांमध्ये घडवला जाईल. स्तंभांवर कमानी बांधल्या जातील आणि त्या देखील 3 दगडांच्या साहाय्याने पूर्ण केल्या जातील. मध्यभागी भव्य घुमट उभारला जाणार असून, संपूर्ण रचना पारंपरिक पद्धतीने साकारली जाईल. आधुनिक यंत्रसामग्रीपेक्षा पारंपरिक तंत्रावर भर दिला जाणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी Jitendra Dudi यांनी सांगितले की, “या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे हे केवळ पुणे जिल्ह्यासाठी नव्हे, तर संपूर्ण राज्य आणि देशासाठी अभिमानास्पद ठरेल. यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे.”
कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक भीमाशंकर येथे येणार असल्याने हा सभामंडप धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची भर ठरणार आहे.






