डोर्लेवाडी वार्ताहर – गोरख जाधव

Baramati : बारामती येथे महाशिवरात्री यात्रेदरम्यान वर्दीधारी होमगार्ड जवानावर झालेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात संताप व्यक्त होत आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना सार्वजनिक ठिकाणी कर्मचाऱ्यावर हात उगारला जाणे ही गंभीर बाब असून, कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे. काही नागरिकांनी “दादा गेले आणि बारामती मध्ये दादागिरी पुन्हा डोकं वर काढत आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 70/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(1), 115(2), 351(2)(3), 352 प्रमाणे विकास दादा लोंढे (रा. अनंतनगर आमराई, ता. बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती. वाहतूक नियंत्रणासाठी बॅरेकेटींग लावून वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्या ठिकाणी होमगार्ड जवान सिंध्दार्थ भारत शिंदे हे अधिकृत गणवेशात कर्तव्य बजावत होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोटारसायकल आत नेण्याचा प्रयत्न केला. नियम समजावून सांगितल्यानंतर त्याने शिवीगाळ, धमकी देत प्रत्यक्ष मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.होमगार्ड म्हणजे ‘पब्लिक सर्व्हंट’
होमगार्ड दल हे पोलीस दलाचे पूरक सहाय्यक बल आहे. आपत्ती व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक बंदोबस्तात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. कायद्यानुसार ते ‘Public Servant’ या श्रेणीत मोडतात. त्यामुळे कर्तव्यात अडथळा आणणे किंवा बलप्रयोग करणे हा दंडनीय गुन्हा ठरतो. शून्य सहनशीलता पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा होमगार्ड जवानांवर हात उगारणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई केली जाईल. “कायद्यापुढे सर्व समान” ही भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी वर्दीधारी कर्मचाऱ्यावर हल्ला होणे ही केवळ वैयक्तिक वादाची बाब नाही; ती संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. शहराच्या राजकीय-सामाजिक वातावरणात नेतृत्वातील बदलांच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी ‘दादागिरी’ची मानसिकता पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र कायद्याचा धाक आणि त्वरित कारवाई यामुळे अशा प्रवृत्तीला आळा बसेल, असा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे.
यात्रा, उत्सव आणि गर्दीच्या काळात पोलीस व होमगार्ड दलास सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपत्कालीन सेवा देणाऱ्या जवानांचा सन्मान राखणे आणि नियमांचे पालन करणे, यामुळेच सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहू शकते.या घटनेने बारामतीत कायदा-सुव्यवस्थेबाबत सजगता वाढवली असून, प्रशासनाच्या ‘शून्य सहनशीलता’ भूमिकेची खरी परीक्षा आता पुढील कारवाईत दिसून येणार आहे.







