उरुळी कांचन, (पुणे): रोहित्र (डीपी) चोरी करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी एका चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. वळती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गट क्र. 545 मधील ‘कुंजीर अॅग्रो फुड्स’च्या शेतात सोमवारी (ता. 11) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी भाऊसाहेब काशिनाथ कुंजीर (वय-52, व्यावसाय शेती रा. वळती ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब काशिनाथ कुंजीर हे वळती येथील रहिवासी असून कुटुबिंयासह एकत्रित राहतात. शेतात कविता कुंजीर यांच्या नावाने ‘कुंजीर अॅग्रो फुड्स’ या नावाने कृषी उदयोग करण्यासाठी शेडचे नवीन काम चालु आहे. त्या कामासाठी 10 ते 15 दिवसापूर्वी विद्युत रोहीत्र बसविले होते. सदर विद्युत राहित्राच्या सुरक्षिततेसाठी शेतामध्ये पोललगत एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला होता.
यावेळी कॅमेऱ्याचे फुटेज पाहत असताना ते दिसत नसल्याने संशय आला. त्यामुळे पोलिस पाटील आणि ग्रामस्थांसह पाहणी करण्यासाठी गेले असता शेतातील डि.पी खाली पाडलेली होती. तर त्यातील ऑईल सांडलेले व डी. पी अर्धवट खोललेली होती. त्यावेळी आजुबाजुस पाहणी सुरु केली असता डी.पी.च्या जवळ पान्हे व इतर साहीत्य असलेली पिशवी पडलेली दिसून आली. यावेळी आजूबाजूला ग्रामस्थांनी शोधाशोध सुरु केली असता जवळच्या झाडीत तिघेजण दिसून आले. तेंव्हा ते त्या ठिकाणावरून पळून जात असताना ग्रामस्थांनी चोरांचा पाठलाग केला.
पुढे एक ते दीड किलोमीटर अंतरावर शिंदवणेच्या हद्दीतील संत यादवबाबा शाळेसमोर आल्यावर चोरांची दुचाकी घसरून पडली. त्यावेळी दोन चोर पसार झाले तर दिनेश तारेच्या कुंपणामध्ये गुंतून खाली पडला. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या इसमा जवळून आधारकार्ड, पॅनकार्ड, 21 हजार रुपये रोख, मोबाईल तसेच चोरीसाठी वापरलेली साधने आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, पकडलेला आरोपी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील दिनेश रामलखन सिंग (वय -47) असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. जखमी आरोपीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उरलेले दोघे फरार आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






