बारामती: लोकसभा निवडणुकीतील दारूण (Ajit Pawar) पराभवानंतर उपमुख्यमंत्री (Baramati News) अजित पवारांनी स्वतःच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. त्याचे स्पष्ट परिणाम इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आले. तब्बल २२ वर्षे एकमेकांशी कट्टर वैमनस्य असलेले पृथ्वीराज जाचक आणि अजित पवार अचानक एकत्र आले आणि तो प्रयोग यशस्वी ठरला. यापूर्वीच त्यांनी काकडे कुटुंबियांना सोबत घेऊन आणखी एक राजकीय समीकरण साध्य केले होते. (Breaking News)

छत्रपती कारखान्यानंतर माळेगाव कारखान्यातही विरोधकांचा जोर वाढलेला पाहून अजित पवारांनी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तावरे गटाची महत्वाकांक्षा आणि अंतर्गत मतभेदामुळे हे समीकरण जमू शकले नाही. त्या निवडणुकीत अजित पवारांनी विजय मिळवला खरा, पण राष्ट्रवादीला संचालक निवडून आणण्यासाठी पडलेल्या कसरतीमुळे दोन्ही बाजूंना अपेक्षित समाधान मिळाले नाही.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी बारामतीतील राजकारणाचा पुढचा अंक सुरू केला आहे. माळेगाव नगरपंचायत आणि बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना निष्प्रभ करण्याचा विडा अजित पवारांनी उचलला आहे. मागील निवडणुकीत थेट त्यांना आव्हान देणारे काही स्थानिक नेते यावेळी त्यांच्या गोटात दाखल झाले आहेत. माळेगावमध्येही रंजन तावरे यांनी पराभवाचा धडा घेत शांत धोरण स्वीकारत अखेर अजित पवारांशी युती केली आहे.
गेल्या तीन दशकांत कट्टर विरोधकांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची प्रतिमा असलेल्या अजित पवारांनी अचानक मैत्रीपूर्ण आणि समन्वय साधणारी नवी राजकीय शैली स्वीकारल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आश्चर्य वाटत आहे. मात्र, स्वतःची ताकद पक्की ठेवली तरच राज्याच्या पातळीवरील प्रभाव टिकवता येतो, याची त्यांना झालेली जाणीव या सर्व घडामोडींमध्ये दिसून येते. विरोधकांनाच सोबत घेऊन पुढे जाण्याची ही नवीन पद्धत अजित पवारांच्या पक्षाच्या आणि बारामतीच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडवत आहे.







