दौंड(पुणे): तालुक्यातील कासुर्डी येथे आमदार राहुल कुल युवा मंच यांच्यावतीने 10 मार्च ते 12 मार्च असा तीन दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवात दररोज सायंकाळी हरिपाठ, कीर्तन, जागर यांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. किर्तन महोत्सव काळात यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांसह अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय आदींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळ पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ह.भ.प दत्तात्रय महाराज सोळसकर (कासुर्डी) यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी प्रामुख्याने हभप हरीश महाराज फडके, हभप तुषार दुर्गुडे, हभप नाना महाराज दोरगे, हभप सोनबा महाराज कुदळे, हभप राहुल महाराज राजगुरू, हभप अभिजीत महाराज जाचक, हभप लक्ष्मण महाराज यादव, हभप पोपट महाराज वाघले, हभप बाळासो महाराज टेमगिरे, हभप बापू महाराज मदने, हभप वाघमारे महाराज, हभप वंदना टेंगले, हभप पल्लवी भिसे, हभप पिंगळे महाराज असे 14 कीर्तनकार उपस्थित होते. यावेळी मंचाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या महोत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प रोहिणी परांजपे (पुणे), ह.भ.प. विनोदाचार्य शिवा महाराज बावसकर (बुलढाणा) तसेच शिवचरित्रकार ह.भ.प प्रदीप महाराज नलावडे (सातारा) यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. यावेळी पंचक्रोशीतील महिलावर्ग, तरुण, ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. दररोज कीर्तनानंतर पंचक्रोशीतील बहुसंख्य भजनी मंडळांनी हरी जागर करत विठू नामाचा जयघोष केला.
यावेळी श्री.विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था (डाळिंब) या संस्थेच्या बाल वारकऱ्यांमुळे कार्यक्रमास विशेष रंगत आली.
महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या कीर्तनकार, गायक, वादक, भजनी मंडळ, देणगीदार, अन्नदाते यांसह ग्रामस्थांचे आमदार राहुल कुल युवा मंच यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून दौंड तालुक्यात प्रथमच भव्य असा हरिकीर्तन महोत्सव आयोजित केला असल्याने कीर्तनकार हभप रोहिणी ताई परांजपे यांनी आ.राहुल कुल युवा मंच कासुर्डी यांचे विशेष कौतुक केले.







