ठाणे: बदलापुरातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी आता बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते. अश्लील फोटो असलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी शैलेश यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला शैलेश वडनेरे यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, मात्र खंडणीखोर सतत पैश्यांची मागणी करत होते. त्यानंतर शैलेश वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली.
या तक्रारीची गंभीरता लक्ष्यात घेत बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास करत बदलापूरमधूनच चार जणांना अटक केली. अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर, दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.