Maharastra Election : राज्यातील 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून अधिकृत वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत झालं, मात्र काही ठिकाणी गोंधळ, आरोप-प्रत्यारोप आणि तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. या निवडणुकीचा निकाल रविवार, 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. (Maharastra Election)

अंबरनाथ : बोगस मतदानाचा आरोप
अंबरनाथमध्ये भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेवर 208 बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे. मतदानासाठी अनेक महिलांना एका सभागृहात एकत्र ठेवण्यात आल्याचं भाजप नेते अभिजीत करंजुळे यांनी सांगितलं. यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि वातावरण चांगलंच तापलं. (Maharastra Election)
मातोश्री नगर परिसरात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी शिंदे गटाने भाजपवर मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. सध्या तिथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
नांदेड : मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप
नांदेडच्या धर्माबादमध्ये महिलांना मंदिर आणि मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला. पैशांचं आमिष दाखवून महिलांना बोलावून घेतल्याचं सांगण्यात आलं. काही महिलांनी सांगितलं की, प्रसादाच्या नावाखाली पैसे देण्याचं आश्वासन देऊन त्यांना तिथे ठेवण्यात आलं होतं.
नंतर इनानी मंगल कार्यालयात ठेवलेल्या मतदारांची सुटका करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तिथे कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, तेलंगणातून आलेले मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप झाल्यानंतर एका महिला आणि पुरुषाला मारहाण झाल्याची घटना घडली. गर्दी वाढल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
कोल्हापूर : मतदान केंद्रावर वाद
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूल मतदान केंद्रावर वाद झाला. गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना मतदान केंद्रात का प्रवेश दिला, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. यानंतर दोन्ही गटांत वाद झाला, मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
कोपरगाव : मतदान केंद्रावर गोंधळ
कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मतदारांवर प्रभाव टाकल्याचे आरोप दोन्ही बाजूंनी झाले. पोलिसांसमोरच वाद झाला आणि काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बारामती : आधीच मतदान झाल्याचा प्रकार
बारामतीत एका मतदाराचं मतदान आधीच झाल्याचं समोर आलं. अहिल्यानगर देवी क्लब मतदान केंद्रावर अमित दिलीप कुलथे मतदानासाठी गेले असता, त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचं लक्षात आलं. नंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी टेंडर वोटची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मतदानाची संधी दिली.
संभाजीनगर : मतदान केंद्राबाहेर जादूटोणा
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री येथे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर जादूटोण्याचा प्रकार समोर आला. भारत माता शाळेबाहेर काळी बाहुली, लिंबू आणि इतर साहित्य आढळून आलं.
सिन्नर : बोगस मतदार पकडला
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक 2 मध्ये एका बोगस मतदाराला पकडण्यात आलं. तो आपल्या भावाच्या जागेवर मतदान करण्यासाठी आला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पनवेल : बोगस मतदार यादीवर वाद
पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये बोगस मतदारांची नावे वगळण्यात न आल्याने माजी नगरसेवकाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. एका व्यक्तीच्या नावावर तब्बल 268 मुलांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.






