वाघोली, (पुणे) : वाघोली (ता. हवेली) परिसरातील आव्हाळवाडी फाटा परिसरात सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर थेट गोळीबार केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात गुन्हेगार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी (ता. 20) सायंकाळी हि घटना घडली आहे.

ओंकार दिलीप भंडारे (वय- 20) असे जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या ओंकार भंडारे याला अटक करण्यासाठी चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डावरे व त्यांचे तपास पथक आवाळवाडी परिसरात दाखल झाले होते. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच, भंडारे याने अचानक पोलिसांवर गोळीबार केला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी उपनिरीक्षक डावरे यांनी प्रतिउत्तर दिले. झाडलेली गोळी भंडारेच्या पायाला लागल्याने तो जागीच जखमी होऊन कोसळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हेगाराकडील शस्त्र जप्त करण्यात आले असून, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर आणखी गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.






