Election : कल्याणमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान मंगळवारी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. प्रचार रॅलीत सहभागी असलेल्या एका वाहनावरील पक्षाचा झेंडा थेट विजेच्या हाय-टेन्शन तारेला लागल्याने अचानक ठिणग्या उडाल्या आणि आगीचा भडका उडाला. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेत एक जण जखमी झाला असला, तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. (Election)

नेमकं घडलं असं की, एका राजकीय पक्षाची प्रचार रॅली कल्याण शहरातील मुख्य रस्त्यावरून जात होती. रॅलीतील पिकअप ट्रकवर उंच दांडे लावून मोठे पक्षाचे झेंडे फडकवले जात होते. हा ट्रक पुढे जात असताना, रस्त्याच्या वरून जाणाऱ्या हाय-टेन्शन विजेच्या तारांजवळ झेंडा गेला आणि अचानक त्याचा तारेला स्पर्श झाला. क्षणार्धात ठिणग्या उडाल्या, धूर निघू लागला आणि उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओत झेंडा तारेला लागताच आग लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली स्पष्टपणे दिसते. काही सेकंद उशीर झाला असता तर वाहनावरील कार्यकर्ते, आजूबाजूचे नागरिक आणि रस्त्यावरची वाहतूक यांना मोठा धोका निर्माण झाला असता.
या अपघातात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली असून तिला तातडीने उपचार देण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र या घटनेने प्रचार रॅलीदरम्यान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
निवडणुकीच्या काळात मोठे झेंडे, उंच फलक आणि खुले वाहन वापरून रॅली काढण्याचं प्रमाण वाढतं. मात्र शहरातील अरुंद रस्ते, खाली झुकलेल्या विजेच्या तारा आणि गर्दी यामुळे असे प्रकार जीवघेणे ठरू शकतात. प्रचाराच्या उत्साहात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची किंमत सामान्य नागरिकांनाही मोजावी लागू शकते.
या घटनेनंतर रॅली काढताना उंच झेंडे, वाहनांची उंची आणि विजेच्या तारांबाबत योग्य काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा स्पष्ट झालं आहे. प्रशासन आणि राजकीय पक्षांनीही अशा घटनांमधून धडा घेत भविष्यात अधिक जबाबदारीने प्रचार करणे गरजेचे आहे.







