Pune Traffic: पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी, मतपेट्यांची हालचाल आणि वितरण तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात सुरक्षा राखण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी अनेक भागांतील वाहतूक वळवली आहे. हे वाहतूक बदल 14 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत लागू राहणार आहेत.

निवडणुकीदरम्यान संवेदनशील भागांमध्ये आपत्कालीन सेवा वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना वाहतूक बदलांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
विमानतळ वाहतूक विभागाच्या हद्दीत फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गाऐवजी प्रवाशांनी विमान नगर चौक आणि नगर रोडचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. विश्रामबाग वाहतूक विभागात पुरम चौक ते टिळक पेठ दरम्यानचा टिळक रोड बंद राहणार असून वाहतूक बाजीराव रोड आणि शास्त्री रोडने वळवली जाणार आहे.
दत्तवाडी वाहतूक विभागात निलयम सिनेमा जवळील फडके चौक तसेच सारसबाग परिसरातील काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. वाहनचालकांनी बाजीराव रोड आणि अप्पा बळवंत चौक मार्गे प्रवास करावा. टिळक रोडकडे जाणारी वाहतूक देशभक्त केशवराव जेधे चौक म्हणजेच स्वारगेट येथून वळवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे.
हडपसर परिसरात शिवसेना चौक ते साने गुरुजी रोड हा रस्ता बंद राहील. अमरधाम, माळवाडी, डीपी रोड आणि हडपसर गाडीतळ हे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समर्थ वाहतूक विभागात नेहरू रोडवरील पॉवर हाऊस चौक ते संत कबीर चौक तसेच एडी कॅम्प चौक ते जुने मोटार स्टँड परिसरात वाहतूक बदल असतील. कोरेगाव पार्क भागात उत्तर मुख्य रस्ता आणि महात्मा गांधी चौकाजवळील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.







