छत्रपती संभाजीनग : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा गैरवापर करून एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शेतकरी जगन्नाथ जयाजी शेळके यांनी महसूल मंत्र्यांच्या फेसबुक पेजवर आपली अडचण मांडली होती, त्यानंतर त्यांना फसवणुकीचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, शेळके यांनी बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या समस्येबाबत पोस्ट केली होती. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवून त्यांची वडिलोपार्जित शेती पडीक पाडली असून त्यामुळे लागवड करता येत नसल्याचे सांगितले.
त्यांची ही पोस्ट पाहून एका अज्ञात व्यक्तीने मंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि शेळके यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पैसे मागितले. रस्त्याची मोजणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावावा लागेल आणि त्यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगत शेतकऱ्याला क्यूआर कोड पाठवला आणि पैसे जमा करण्यास सांगितले त्यांनी दोनदा शेकऱ्याला पैशांसाठी फोन केला.
याप्रकरणी शेतकऱ्याला शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसांत याविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर फसवणूक आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. महसूल मंत्र्यांचे नाव वापरून अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले असून, सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.







