मुंबई: स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कठोर पाऊल उचलले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, ज्या ग्राहकांच्या घरात ‘पाइप नॅचरल गॅस’ (PNG) पोहचला आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडर वापरता येणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, गॅसची पाइपलाईन आणि सिलेंडर असे ‘डबल कनेक्शन’ आता बेकायदेशीर ठरणार आहे.

केंद्र सरकारने ‘एलपीजी पुरवठा आणि वितरण नियमन’ आदेशात मोठी सुधारणा केली आहे. यानुसार, पीएनजी सुविधा असलेल्या ग्राहकांना नवीन सिलेंडर घेणे किंवा जुन्या सिलेंडरचे रिफिलिंग करणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ज्यांच्याकडे सध्या दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांनी स्वतःहून एलपीजी कनेक्शन गॅस एजन्सीकडे जमा करणे अनिवार्य आहे.
भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवासाची परवानगी मिळाल्याने सध्या गॅस पुरवठा खंडित होणार नाही, मात्र भविष्यातील अनिश्चितता टाळण्यासाठी सरकार आधीच सज्ज होत आहे.







