इस्लामाबाद: गेल्या 47 वर्षांतील सर्वात मोठी ऐतिहासिक संधी मानली जाणारी अमेरिका-इराण शांतता वार्ता अखेर कोणत्याही निष्कर्षाविना फिस्कटली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये तब्बल 21 तास चाललेल्या या ‘हाय व्होल्टेज’ चर्चेनंतर दोन्ही देशांमधील तणाव आता अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

1979 नंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी समोरासमोर बसले होते. अमेरिकेचे नेतृत्व उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स करत होते, तर इराणकडून संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आले होते. ही चर्चा सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि लष्करी मुद्द्यांवर केंद्रित होती. मात्र, होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि युद्धभरपाई या दोन मुद्द्यांवरून दोन्ही देशांमधील संवाद अडकला. इराणने लेबनॉनवरील हल्ले थांबवण्यासह त्यांच्या गोठवलेल्या मालमत्ता मुक्त करण्याची अट ठेवली होती, जी अमेरिकेने फेटाळून लावली.
जे.डी. व्हान्स यांनी स्पष्ट केले की, इराण कराराच्या अटी स्वीकारण्यास तयार नाही. दुसरीकडे, इराणने अमेरिकेच्या मागण्यांना ‘अवास्तव’ ठरवले आहे. विशेष म्हणजे, ही चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून इराणला ‘अपयशी देश’ संबोधत डिवचले. दोन्ही शत्रूंना एका टेबलावर आणण्यात पाकिस्तानला यश आले असले तरी, अंतिमतः तो ‘मध्यस्थ’ म्हणून अपयशी ठरला आहे.
जर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव असाच राहिला, तर आगामी काळात इंधन दरवाढ आणि मध्य-पूर्वेतील अस्थिरतेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचे पडसाद उमटू शकतात. आता सर्वांचे लक्ष राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढील पावलाकडे लागले आहे.







