बँकॉक: थायलंड येथे ईशान्य भागात (Thailand News) घडलेल्या धक्कादायक घटनामुळे कोणाचेही काळीज पिळवटून निघेल. एका डे-केअर सेंटरमध्ये (बालवाडी) शिरून एका माथेफिरूने केलेल्या अमानुष हल्ल्यात 22 निरागस चिमुकल्यांसह 34 जणांचा बळी गेला आहे. दुपारच्या वेळी मुले झोपलेली असतानाच, हा हल्लेखोर हातात बंदूक आणि चाकू घेऊन तिथे शिरला. त्याने समोर येईल त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. विशेष म्हणजे, हा क्रूर कृत्य करणारा दुसरा तिसरा कोणी नसून एक माजी पोलीस अधिकारी आहे.

अंमली पदार्थांच्या सेवनामुळे त्याला काही काळापूर्वीच नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. कदाचित याच नैराश्यातून किंवा रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या धक्कादायक घटनेनंतर हल्लेखोराने स्वतःच्या कुटुंबालाही संपवले आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
थायलंडमध्ये बंदूक बाळगण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त असले तरी, अशा प्रकारचे हल्ले फार कमी घडतात. मात्र, या घटनेने केवळ थायलंडच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी जर चिमुकले सुरक्षित नसतील, तर हा मुद्दा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.







