नवी दिल्ली: ज्या काळात बातम्या म्हणजे केवळ (Sarla Maheshwari) माहिती नाही तर ‘विश्वासार्हता’ असायची, त्या काळातील एक दिग्गज नाव म्हणजे सरला माहेश्वरी. दूरदर्शनच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या प्रसिद्ध वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन झाले असून, भारतीय टेलिव्हिजन पत्रकारितेतील एका सुसंस्कृत पर्वाचा आज अंत झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.

साधी साडी, कपाळावर छोटी टिकली आणि अत्यंत स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची ओळख. ‘आजच्या ठळक बातम्या’ सांगताना त्यांच्या आवाजात जो संथपणा आणि गांभीर्य असायचे, त्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. त्या केवळ बातम्या वाचत नसत, तर त्या बातमीतील सत्यतेचा त्या स्वतः एक पुरावा वाटायच्या.
सरला माहेश्वरी यांनी त्या पिढीचे प्रतिनिधित्व केले, ज्यांनी भारतीय पत्रकारितेचा पाया रचला. अनेक क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या’साधेपणाचा’ उल्लेख केला आहे. सोशल मीडियावर आज अनेक चाहत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.







