पुणे: राज्यातील (Municipal Election) २९ महानगरपालिकांच्या एकूण २,८६९ जागांसाठी आज मतदान होत असून, सुमारे ३.४८ कोटी मतदार आज निर्णय घेणार आहे. आरक्षण, प्रभाग रचना आणि कायदेशीर गुंतागुंतीमुळे या निवडणुका दीर्घकाळ रखडल्या होत्या. या विलंबामुळे अनेक शहरांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने नागरी समस्यांचा डोंगर साचला होता. आजचे मतदान केवळ नगरसेवक निवडण्यासाठी नसून, तुमच्या गल्लीतील रस्ते, पाणी आणि कचऱ्याचे प्रश्न कोण सोडवणार, हे ठरवण्यासाठी आहे.

मुंबई (BMC) वगळता इतर सर्व शहरांत ‘बहुसदस्यीय प्रभाग रचना’ लागू आहे. याचा अर्थ, एका प्रभागातून एकाच वेळी ३ किंवा ४ नगरसेवक निवडले जाणार आहेत. नागरिकांना आपल्या प्रभागातील सर्व जागांसाठी स्वतंत्र मतदान करणे अनिवार्य आहे.
गोंधळ टाळण्यासाठी ईव्हीएमवर ४ वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका असतील. प्रत्येक रंगाच्या गटातून (अ, ब, क, ड) एका उमेदवाराला निवडून तुम्हाला एकूण ४ वेळा बटण दाबावे लागेल. जोपर्यंत तुम्ही सर्व मते नोंदवत नाही, तोपर्यंत तुमचे मतदान पूर्ण होणार नाही.
मतदारांसाठी महत्त्वाची माहिती
-
मतदानाची वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत.
-
सुटी: मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
-
निकाल: उद्या, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
केवळ सुटीचा आनंद न घेता, आपल्या शहराच्या विकासासाठी घराबाहेर पडा आणि मतदान करा. कारण तुमचे एक मत पुढील पाच वर्षांसाठी तुमच्या भागातील पायाभूत सुविधा नीट आहेत कि नाही ते पाहण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी हक्काचा नगरसेवक निवडून देणार आहे.







