Home Buying Tips: पगारदार वर्गासाठी स्वतःचे घर विकत घेणे हे आयुष्यातील सर्वात मोठे उद्दिष्ट असते. मात्र, हा निर्णय घेताना केवळ स्वप्नांचा विचार न करता आर्थिक वास्तवाचे भान ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा तुमच्याकडे किमान काही वर्षांची बचत जमा असेल, तेव्हाच घर घेण्याचा विचार करावा. गृहकर्ज घेताना बँका फक्त 80 टक्के रक्कम देतात, त्यामुळे उरलेली 20 टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून भरण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा असणे गरजेचे आहे. जर ही रक्कम नसेल, तर घाईत कर्ज काढून घर घेणे भविष्यात जड जाऊ शकते.

तुमच्या डोक्यावर आधीच गाडीचे कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज असेल, तर घराच्या मोठ्या हप्त्यामुळे तुमचे महिन्याचे बजेट कोलमडू शकते. आधीची सर्व लहान-मोठी कर्जे फेडून झाल्यावरच घरासाठी पाऊल उचलावे, जेणेकरून आर्थिक ताण येणार नाही. आपल्या पगाराच्या प्रमाणात घराची किंमत ठरवावी, जेणेकरून हप्ता भरूनही कुटुंबाच्या गरजा आरामात पूर्ण होतील. दरम्यान, आजार किंवा इतर महत्वाच्या कामासाठी काही रक्कम बाजूला ठेवलेली नसेल, तर घर घेण्याचा निर्णय काही काळ थांबवणेच शहाणपणाचे ठरते.
घराच्या मुख्य किमतीव्यतिरिक्त होणाऱ्या छुप्या खर्चांकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. यामध्ये घराची नोंदणी करणे, स्टॅम्प ड्युटी भरणे आणि घराचे इंटिरियर काम यांचा समावेश होतो. हे खर्च कधीकधी लाखांच्या घरात जातात. तसेच नवीन घरात सामान हलवण्याचा खर्चही मोठा असू शकतो. त्यामुळे घर घेण्याआधी या अतिरिक्त खर्चासाठी स्वतंत्र बचत केलेली असावी. जर तुमच्याकडे या खर्चाचे नियोजन नसेल, तर घराचे स्वप्न पूर्ण करताना तुमची आर्थिक ओढाताण होऊ शकते. योग्य तयारी आणि नियोजनाने घेतलेले घरच खऱ्या अर्थाने सुखाचे ठरते.







