नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील घडलेली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, दिल्लीतील South Asian University च्या आवारात (Delhi News) एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका सुरक्षा रक्षकासह दोन विद्यार्थ्यांनी आणि एका अज्ञात पुरुषाने तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

पीडित विद्यार्थिनी सोमवारपासून बेपत्ता होती. मंगळवारी ती जखमी अवस्थेत आणि फाटलेल्या कपड्यांमध्ये आढळली. घटनेची माहिती वसतिगृह प्रमुखाला रात्रीच मिळाली, तरीही त्यांनी तिला तत्काळ मदत करण्याऐवजी सकाळी येण्यास सांगितले. पोलिस किंवा रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा तिचा प्रयत्न दुर्लक्षित केला गेला, आणि तिला कपडे बदलून अंघोळ करण्यास सांगण्यात आले.

घटना ऑक्टोबर 12 रोजी सायंकाळी घडली. पीडिता सायंकाळी 8 वाजता मेस हॉलकडे जात असताना रस्त्याजवळ एका बांधकामाधीन इमारतीजवळ मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत बसली होती. तिथे तैनात गार्डने कोणालातरी बोलावले, काही वेळात मध्यमवयीन माणूस आला, आणि दोन विद्यार्थी धावत आले. आरोपींनी तिला खांदे पकडले, जॅकेट काढण्याचा प्रयत्न केला आणि वरच्या मजल्यावर एका रिकाम्या खोलीत ओढून नेले. तिला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळी कोंबली आणि नंतर अत्याचार केला. या घटनेत मेस कर्मचारी गाडी घेऊन पोहोचल्यामुळे चारही आरोपी पळून गेले आणि विद्यार्थिनीचा जीव वाचला.

घटनेपूर्वी एक विद्यार्थी (Aryan Yash) सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे तिला अश्लील आणि धमकीचे मेसेज पाठवत होता, असे पीडितेने जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सांगितले. दोन दिवसांपर्यंत ना पोलीस पोहोचले, ना वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अखेर ओळखीच्या व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पोलीस पोहोचले आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिला जबाब नोंदवला. या गंभीर घटनेमुळे दिल्लीसह देशभरातील विद्यापीठांमध्ये महिला सुरक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.







