कर्नाटक: ख्रिसमसच्या (Bus Accident) सुट्ट्यांचा प्रवास काही लोकांसाठी जीवघेणा ठरला असून गुरुवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली आहे. चित्रदुर्गमधील हिरियुर भागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 48 वर एका खासगी बसला बेंगळुरूहून निघालेल्या ट्रकने जोरात धडक दिली. या धडकेनंतर काही वेळातच बसला भीषण आग लागली आणि प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत होरपळून अंदाजे 17 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण अचानक सुटले आणि ती दुभाजक ओलांडून बसला धडकली. बस स्लीपर कोच स्वरूपाची असल्याने प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडला नाही आणि अनेक लोक आतच अडकून पडले. ही आग इतकी मोठी होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र आगीमुळे बचावकार्यात मोठे अडथळे आले. जे प्रवासी बसमधून कसेबसे बाहेर पडले, त्यातील अनेकजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रणजित यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. प्राथमिक पाहणीत ट्रक चालकाच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.







