Bengaluru Video : बंगळुरू: बंगळुरूमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नी रस्त्यावर मदतीसाठी हात जोडून विनवणी करत होती. मात्र पहाटेच्या वेळेत रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही वाहनचालकाने तिला मदत केली नाही. Bengaluru Viral Video

हेही वाचा- उठल्याबरोबर चहा पिताय? रिकाम्या पोटी चहा पित असाल तर ‘हे’ वाचा
पत्नीच्या डोळ्यांसमोरच पतीचा तडफडत मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दक्षिण बंगळुरूतील बालाजी नगर भागात राहणारे आणि गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणारे व्यंकटरामन यांना पहाटे साडे तीनच्या सुमारास छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिक बिघडू लागली. पतीची अवस्था पाहून पत्नीने तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.
पत्नीने व्यंकटरामन यांना दुचाकीवर बसवून जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर पत्नी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेली. तेथे ईसीजी तपासणीनंतर सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र अधिक उपचारासाठी दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
या दरम्यान रस्त्यावरच व्यंकटरामन यांची प्रकृती खूपच खालावली. पत्नीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून मदतीची याचना केली. पाच ते सहा वाहने तिथून गेली, पण कोणीही थांबले नाही. पत्नी हात जोडून मदत मागत होती, तर दुसरीकडे पती मृत्यूशी झुंज देत होते.
काही मिनिटांनंतर एका टॅक्सी चालकाने अखेर गाडी थांबवली. त्याने व्यंकटरामन यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार व्यंकटरामन यांचे लग्न 2020 मध्ये झाले होते. त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी आहे. या दु:खद घटनेनंतरही कुटुंबाने माणुसकी जपत व्यंकटरामन यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.





