Crime News : पीजीवर राहणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पीजीवर राहणाऱ्या इतर मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बंगळुरूच्या गंगोत्री सर्कलजवळील लक्ष्मण दुर्गा लेडीज पीजीमध्ये राहत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीच्या खोलीत रात्रीच्या वेळी एक अनोळखी व्यक्ती घुसला. या व्यक्तीने तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास तिच्या खोलीत एक अज्ञात व्यक्ती शिरला आणि त्या व्यक्तीने तरुणीच्या पायांना, हातांना स्पर्श करायला सुरुवात केली. स्पर्श जाणवल्यानंतर तरुणी घाबरुन उठली. त्यानंतर आरोपीने तिला चाकू दाखवत धमकावले. आणि तरुणीच्या पायावर नखांनी ओरखडे काढले. तिला दोनदा मारहाण केली. त्यानंतर आरोपी खोलीतील पैसे घेऊन पळून गेला.
आरोपी पळत जात असताना तरुणी त्याच्या मागे गेली आणि तिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने जिना उतरत असताना तरुणीला पुन्हा एकदा मारहाण केली. आणि पळून गेला. अज्ञात आरोपी पळतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, ‘तरुणी ही नोकरदार असून ती ऑगस्ट महिन्यापासून दोन तरुणींसह पीजीमध्ये राहत आहे. ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळी तरुणीची एक रुममेट कामावर होती, तर दुसरी झोपली होती. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत आणि तपास सुरु केला आहे. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, पीजी मालकाने ही घटना पीडितेच्या खोलीत नव्हे, तर कॉरिडॉरमध्ये घडल्याचे म्हटले आहे. यासंबंधित जेव्हा पोलीस पीडित महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तिने बोलण्यास नकार दिला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, नेमकं त्या रात्री काय घडलं? तो व्यक्ती कोण होता? याचा शोध घेत आहेत.







