मुंबई: मुंबईतील सांताक्रुझच्या वाकोला पोलीस कॅम्प (Police Constable Suicide) परिसरात घडलेल्या एका आत्महत्येच्या घटनेने पोलीस दलात आणि शहरात खळबळ उडाली आहे. नुकतेच सेवेत रुजू झालेल्या 32 वर्षीय पोलीस शिपाई भैय्यासाब भीमराव व्हावळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 15 मार्च रोजी घडली. (Mumbai News)

व्हावळे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्त झाले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच घडलेली ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये वैयक्तिक आयुष्यातील तणाव हा या टोकाच्या निर्णयामागील मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हावळे यांचे नांदेड जिल्ह्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केला होता. या विरोधाचे रूपांतर मानसिक छळात झाल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. संबंधित कुटुंबीयांकडून वारंवार धमक्या दिल्या जात होत्या, तसेच नोकरीवर परिणाम करण्याची भीती दाखवली जात होती, असेही नमूद करण्यात आले आहे. या तणावामुळे त्यांनी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतल्याचे दिसून येते.
या प्रकरणी व्हावळे यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी तरुणीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून सुसाईड नोटमधील उल्लेख आणि इतर पुराव्यांच्या आधारे चौकशी केली जात आहे.







