NCP Politics: मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. 2026 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Politics) दोन्ही गटांमध्ये मुंबईतील निवडणुकीबाबत चर्चा रंगू लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर आता मुंबईतही अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीमध्ये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित जागा मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना आणि भाजपकडूनही राष्ट्रवादीला जास्त जागा देण्याबाबत फारसा उत्साह नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पर्यायी मार्गांचा विचार सुरू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बुधवारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मुंबई प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी शरद पवार गटासोबत निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येताना दिसू शकतात.
मात्र दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेसोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. नवाब मलिक प्रकरणामुळे शिवसेना आणि भाजपकडून माघार येण्याची शक्यता कमी असल्याचेही बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात मुंबईतील निवडणूक राजकारणात कोणती दिशा ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





