Municipal Election : मीरा-भाईंदर : महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे उमेदवार जावेद पठाण यांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळातच हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने निवडणूक प्रक्रियेला शोकाचे सावट पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जावेद पठाण (वय 66) यांनी मंगळवारी सकाळी 10.00 ते 11.00 वाजेदरम्यान प्रभाग क्रमांक 22 साठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. मात्र दुपारी सुमारे 3.30 वाजताच्या सुमारास मीरा रोड येथील हैदरी चौक परिसरात असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला.
घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जावेद पठाण हे अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणारे आणि नागरिकांशी सतत संपर्कात राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ते तयारी करत होते आणि प्रचाराची रूपरेषा आखत होते.
त्यांच्या निधनाची बातमी पसरताच मीरा-भाईंदरमधील नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्यात शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत असताना घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण वातावरण हळहळजनक बनले असून पठाण यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.






