Mumbai Accident : मुंबई : मुंबईतील मालाड (Malad) पूर्व भागात शनिवारी एक हृदयद्रावक अपघात घडला. निलयोग विराट परिसरातील एका निवासी इमारतीबाहेर खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलाला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Accident News

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्य सिंग असे या मुलाचे नाव आहे. तो इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचवेळी इनोव्हा क्रिस्टा कार वेगात आली आणि थेट त्याला धडकली. धडक दिल्यानंतर कार काही अंतर पुढे गेली, मात्र चालकाने गाडी थांबवून जखमी मुलाला मदत केली नाही. उलट तो घटनास्थळावरून पळून गेला.

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये कार मुलाला धडकताना, थोडा वेळ थांबताना आणि नंतर चालक निघून जाताना दिसत आहे. अपघातानंतर इमारतीतील एका सुरक्षा कर्मचाऱ्याने धाव घेत मुलाला उचलले आणि इतरांच्या मदतीने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्यचे वडील जयप्रकाश सिंग यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी लग्नाचा आनंदोत्सव साजरा झाला होता. जर चालकाने माणुसकी दाखवून मुलाला रुग्णालयात नेले असते तर त्याचा जीव वाचला असता, असे ते म्हणाले.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






