मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या डी. बी. मार्ग पोलीस (Crime News) ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यावर उभा राहून येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना (Mumbai News) अडवून मोबाईलवर मुलींचे फोटो दाखवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईनंतर एक हाय प्रोफाईल दलालीचे प्रकरण समोर आले असून, पोलिसांकडून सध्या सखोल तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डी. बी. मार्ग पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या दयानंद बिल्डिंग परिसरात सोमवारी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने या भागात सापळा रचला. यावेळी एक व्यक्ती रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पुरुषांना अडवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तो आपल्या मोबाईलमधील काही तरुणींचे फोटो दाखवत होता आणि ग्राहक शोधत असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपीचे नाव मुकेश यादव असल्याचे समोर आले. चौकशीत त्याने वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना प्रवृत्त करत असल्याची कबुली दिली. तो ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांना व्हॉट्सअॅपवरून मुलींचे फोटो पाठवत होता. त्यानंतर व्यवहार ठरवून त्या बदल्यात मोठी दलाली घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दलालीतून आरोपी बक्कळ पैसा कमवत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी मुकेश यादव याला अटक केली असून त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमधील चॅट्स, फोटो आणि संपर्कांची तपासणी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आरोपीसोबत आणखी कोण सहभागी आहेत का, तसेच तो मुलींना कुठून आणि कशा पद्धतीने या व्यवसायात ओढत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.
डी. बी. मार्ग पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या दलाली नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. गजबजलेल्या परिसरात उघडपणे सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.







