मुंबई: मुंबईत बनावट विनयभंग प्रकरण (Crime News) दाखल करून 10 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा (Mumbai News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेलने कारवाई करत दोन महिलांना रंगेहाथ अटक केली आहे. खंडणी स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बने वय 39 आणि अम्रिना इक्बाल झवेरी उर्फ अॅलिस उर्फ अम्रिना मॅथ्यू फर्नांडिस वय 33 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत. गोरेगाव पश्चिम येथे राहणारे व्यावसायिक अरविंद गोयल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
अरविंद गोयल हे गोयल अँड सन्स इन्फ्रा LLP कंपनीचे संचालक आहेत. त्यांचा मुलगा रितम गोयल याचा 5 नोव्हेंबर रोजी यश्वी शहा हिच्याशी साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याच्या आनंदात 14 नोव्हेंबर रोजी अंबोली परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टी संपल्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.40 वाजता रितम गोयल, त्याची होणारी पत्नी, तिचा भाऊ आणि एक मित्र लिफ्टने खाली येत असताना एक अनोळखी महिला लिफ्टमध्ये आली.
या महिलेने रितम गोयल याने लेझर लाईट टाकल्याचा आरोप केला. यावरून वाद झाला आणि लिफ्ट खाली पोहोचताच त्या महिलेने आरडाओरड करत गोंधळ घातला. त्यानंतर अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याच्या आधारे आरोपी महिलांनी प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्यासाठी 10 कोटी रुपयांची मागणी केली. नंतर ही रक्कम 5.5 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. अखेर 20 डिसेंबर रोजी 1.5 कोटी रुपये रोख स्वीकारण्याचे ठरले. लोअर परळ परिसरात पैसे घेत असतानाच पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली. या प्रकरणात उत्कर्ष नावाचा तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.







