मुंबई: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, या निवडणुकांकडे राज्याच्या शहरी राजकारणाच्या दृष्टीने विशेष लक्ष लागले आहे. विशेषतः देशातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या बृहन्मुंबई (BMC Election) महानगरपालिकेची निवडणूक 2017 नंतर प्रथमच होत असल्याने या लढतीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांचे नाव मतदार यादीत नसल्याने ते नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत. “माझे नाव मतदार यादीत नव्हते, त्यामुळे मी मतदान करू शकलो नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नवी मुंबई, ठाणे आणि पिंपरी-चिंचवड यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये हाय-व्होल्टेज स्पर्धा पाहायला मिळत आहे. एकूण 2,869 जागांसाठी 15,908 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांचे भवितव्य 3 कोटी 48 लाख मतदार ठरवणार आहेत.
या निवडणुकांच्या निकालांकडे राज्यातील सत्तासमीकरणे आणि आगामी राजकीय दिशा ठरवणारी महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.







