पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांशी संबंधित कथित पेपरफुटी आणि इतर तक्रारींच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पेपरफुटीच्या प्रकरणात आपल्याविरोधात पुरावे असतील तर आपण पद सोडण्यास तयार असल्याचे भीमनवार यांनी म्हटल्याचा संदर्भ देत पवारांनी आपली भूमिका मांडली.

पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी भीमनवार यांच्या पूर्वीच्या प्रशासकीय कार्यकाळातील काही तक्रारी आणि कथित गैरव्यवहारांबाबत माहिती मांडली. या प्रकरणांची चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित तक्रारी असूनही कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, MPSC अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांनी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचे नाव पुढे केले आहे. तसेच नाशिकचे आयुक्त प्रवीण गेडाम यांचेही नाव समोर आले आहे. याप्रकरणी सरकारने 2 दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी दिली नाही तरी आंदोलन करणार असल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.







