मुंबई: मुंबई शहरावर (26/11 Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. देशाच्या इतिहासातील सर्वात क्रूर मानल्या गेलेल्या या हल्ल्यात 10 सशस्त्र दहशतवाद्यांनी संपूर्ण शहराला वेठीस धरले होते. सीएसटी रेल्वे स्थानक, हॉटेल्स, प्रसिद्ध कॅफे आणि रुग्णालये यांसारखी गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य होती.

मुंबई शहराचा वेग तीन दिवसांसाठी पूर्णपणे थांबला होता. या भयानक हल्ल्यामुळे 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 500 हून अधिक लोक जखमी झाले होते. इतकी वर्षे झाली तरी, या रात्रीची भीषणता आणि त्यानंतरच्या बचावकार्याच्या शौर्याची आठवण भारतीयांच्या मनात कायम आहे.
या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय ‘लष्कर-ए-तैयबा’ या गटाची निवड केली होती आणि ते चार टीम्समध्ये विभागले गेले होते. त्यांनी 21 नोव्हेंबरला कराचीहून आपला प्रवास सुरू केला. वाटेत त्यांनी 23 नोव्हेंबरला ‘कुबेर’ नावाच्या भारतीय मासेमारी बोटीचे अपहरण केले. बोटीचे कॅप्टन आणि खलाशी यांना ठार मारून त्यांनी बोट मुंबईच्या दिशेने आणली. त्यानंतर बोटीतून मुंबई शहरात प्रवेश करत त्यांनी हल्ले सुरू केले होते.
26/11 च्या हल्ल्यानंतर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल झाले. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाच्या नागरिकांच्या मनावर न भरून निघणारी मोठी जखम अजूनही कायम आहे.







